आयुर्वेदिक औषधांचे काही साईड इफेक्ट नाही हे खरं आहे का?


“आयुर्वेदिक औषधांचे काही साईड इफेक्ट नसतात म्हणून आम्ही ती घेतो” हे वाक्य अनेकदा रुग्णांकडून ऐकायला मिळते. साईड इफेक्ट म्हणजे काय तर
औषधाने दिल्या जाणाऱ्या मुख्य उपचारात्मक परिणामांव्यतिरिक्त शरीरावर जाणारा अनपेक्षित किंवा अवांछित परिणाम म्हणजे साईड इफेक्ट. हे परिणाम हलके असू शकतात किंवा काही वेळा गंभीर स्वरूपाचेदेखील. ज्या गोष्टीला इफेक्ट आहे त्याला साईड इफेक्ट ही असू शकतात हे वास्तव आहे.
प्रश्न: आयुर्वेदिक औषधांमध्ये साईड इफेक्ट्स का होऊ शकतात?
उत्तर:
1) सर्वात महत्वाचे कारण म्हणजे मनाने औषध घेणे.
हर्बल आहेत म्हणून कोणीही मनाने ती घेऊ नयेत. आयुर्वेदात वर्णन केलेल्या अनेक औषधी उच्च पोटेन्सी असलेल्या आहेत, जसे रसौषधी त्यांचा वापर अत्यंत विचारपूर्वक करणे आवश्यक असते आणि मात्रा देखील अचूक ठरवावी लागते. अशा वेळेस त्या चुकीच्या मात्रेत, दीर्घकाळ घेतल्यास त्रास होऊ शकतो आणि दोष मात्र आयुर्वेदाला दिला जातो.
2) निकृष्ठ प्रतीच्या कंपनीचे औषधी वापरणे.
सध्या मार्केट मध्ये खूप औषधी कंपनी आहेत. प्रोफिट कमवायच्या नादात कधीकधी औषध निर्माण प्रक्रियेत शॉर्ट कट वापरले जातात यामुळे उत्तम प्रतीचे औषध निर्माण होत नाही. त्यामुळे कंपनी खात्रीशीर आहे ना हे तपासणे आवश्यक.
3) आयुर्वेद पदवीधर व्यक्तीकडूनच तपासणी नंतरच त्यांनी सांगितल्या प्रमाणे औषधी घेणे. अनुपान जसे मध/ तूप/ गरम पाणी हे पण सांगितल्याप्रमाणे घेणे, मनाने
बदल करू नये.
4) वजन कमी करणे/ वाढवणे यासाठी मार्केट मध्ये अनेक हर्बल पावडर मिळतात. त्यावर वापरलेले कन्टेन्ट सुद्धा व्यवस्थित लिहिलेले नसतात, हे सर्व टाळावे. भारतात आयुर्वेदिक औषधांच्या विक्रीवर कठोर निर्बंध नसल्यामुळे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय ती सहज उपलब्ध होतात.
साध्या जेवणातसुद्धा मिरची जास्त झाली तर शरीराला त्रास होतो. मग हे तर औषध आहे, चुकिचे सेवन केल्यास परिणाम निश्चितच दिसतील. म्हणूनच जाहिरात, सोशल मीडिया पोस्ट किंवा “आयुर्वेदिक आहे, काही साईड इफेक्ट नसतात” या भ्रमावर विश्वास ठेवून औषधी घेण्याआधी खालील सूचना लक्षात ठेवा.
✔️ वैद्याने ठरविलेल्या डोस, अनुपान व कालावधीचे काटेकोर पालन
✔️ ज्ञात ब्रँड व गुणवत्तेची उत्पादने निवडणे
✔️ यकृत, मूत्रपिंड किंवा इतर प्रमुख आजार असल्यास नियमित तपासणी
✔️ उगाच कोणतीही “हर्बल” जाहिरात पाहून स्वतः औषध सुरू न करणे
✔️ इतर औषधे घेत असल्यास वैद्याला आधी माहिती देणे
डॉ. स्नेहल निकम (एम. डी . आयुर्वेद)
तत्वमसि हेल्थ क्लिनिक आणि पंचकर्म सेन्टर, पुणे.



Comments