तु एकटी नाहीस गं..! (डिलिव्हरी नंतरच्या नैराश्याची गोष्ट)


फोन वाजला आणि तिचं नाव स्क्रिनवर झळकलं.
माझी मैत्रीण — जी काही महिन्यांपूर्वीच आई झाली होती.
मी उत्साहात फोन उचलला आणि आनंदाने अभिनंदन करून तब्येतीची विचारणा केली.
ती म्हणाली, “बाळ छान आहे.”
मी तिला विचारलं, “तु कशी आहेस?”
ती म्हणाली, “ठीक आहे,” पण तिच्या आवाजात नेहमीचा उत्साह जाणवला नाही.
“काय ग? तब्येत ठीक नाहीये का?”
समोरून शांतता...
काय बिनसलं ते कळायला मार्ग नव्हता.
हळूहळू बोलायला लावलं तर ती रडायलाच लागली.
“सर्व काही छान आहे गं — घरचे खूप काळजी घेतात, नवरा प्रेमळ आहे, समजूतदार आहे, खूप मदतही करतो. बाळ पण मस्त आहे... पण मला काय झालंय कळत नाहीये.
सारखं विनाकारण रडावंसं वाटतं.
शारीरिक तक्रारींसोबत मानसिक त्रासही खूप होतोय.
काही सुचत नाहीये बघ.
मी आधी अशी नव्हते, पण आता खूप हळवी झाले आहे.
सारखे मूड स्विंग्स होतात.
भीती वाटत राहते.
कसं बाहेर यावं गं...?”
बापरे!
ती हळूहळू पोस्टपार्टम डिप्रेशन (डिलिव्हरीनंतर येणारं मानसिक नैराश्य) कडे चालली होती.
मी तिला समजावलं —
“तु एकटीच नाही आहेस गं.
खूप जणींना हा त्रास होतो.
प्रेग्नन्सीमुळे स्त्रीच्या शरीरात खूप बदल होतात.
आधीचं शरीर आणि आताचं शरीर — यांची तुलना होऊच शकत नाही.
त्याला रिकव्हर व्हायला थोडा वेळ दे.
बघ, बाळ पोटात असताना आपण स्वतःची खूप काळजी घेतो.
पण बाळ बाहेर आल्यानंतर सगळा फोकस बाळाकडे शिफ्ट होतो.
स्वतःची काळजी घेतलीच जात नाही.”
ती म्हणाली,
“हो गं, जागरण, सतत थकवा, बाळाची काळजी, नवीन आई झाल्याचं दडपण —
आपण कमी पडू नये म्हणून ओढाताण होते गं…”
या सर्व गोंधळात —
तू पहिल्यांदा ‘मदत मागायला’ शिक.
स्वतःला थोडा वेळ दे.
आयुर्वेदात सूतिका (नवीन आई) साठी विशेष परिचर्या सांगितली आहे –
🔸 विश्रांती –
शरीराला पूर्ण आराम देणं गरजेचं आहे. जबाबदाऱ्या वाटून घ्या.
🔸 पौष्टिक आहार –
गायीचं दूध, तूप, सूप, मूगाची खिचडी, औषधी काढे यांचा आहारात समावेश करा.
🔸 तेलाने मालिश (स्नेहन) –
वात संतुलनासाठी नियमित अभ्यंग (तिळाच्या किंवा औषधी तेलाने) करा.
🔸 औषधी स्नान –
उबदार पाण्यात औषधी द्रव्यांनी स्नान केल्याने थकवा कमी होतो.
🔸 मानसिक आधार –
आईला प्रेम, समजूतदारपणा आणि मानसिक आधार मिळणं अत्यंत गरजेचं आहे.
मी वरील गोष्टी पाळण्याचा प्रयत्न करेन.
हो, आणि लक्षात ठेव –
स्वतःची काळजी घेणं ही स्वार्थी गोष्ट नाही, ती आवश्यक आहे.
मदत मागणं हे धैर्याचं लक्षण आहे.
जर मनस्थिती सतत खालावलेली वाटत असेल,
आत्मविश्वास कमी होत असेल,
बाळाकडे किंवा स्वतःकडे प्रेम वाटत नसेल,
तर त्वरित तज्ज्ञांची (वैद्य, समुपदेशक किंवा मानसोपचारतज्ज्ञ) मदत घे.
खूप हलकं वाटलं तुझ्याशी बोलून...
अगं, तू एकटी नाहीस.
हजारो स्त्रिया हा अनुभव घेतात, पण योग्य मार्गदर्शन आणि काळजीने त्यातून बाहेर पडता येतं.
आई आनंदी असेल तर बाळही आनंदी असेल —
म्हणून स्वतःवर प्रेम कर, शरीर-मनाला वेळ दे आणि आवश्यक तेव्हा मदत घे.



Comments