"प्रकृती — आपल्या शरीराचा जन्मजात स्वभाव"


सर्व कामे आटोपली आणि मोबाईल हातात घेतला.
मोनिकाचा मॅसेज होता —
"स्नेहल, फ्री झालीस की कॉल कर, मला प्रकृती विषयी तुझ्याशी बोलायचं आहे."
मला आश्चर्य वाटलं — "हिला अचानक प्रकृती कशी आठवली?"
मी तिला लगेच कॉल केला.
“काय झालं गं मोनिका? प्रकृतीचा विषय कसा काय आला?”
ती म्हणाली —
“काल ऑफिसमध्ये माझ्या हेल्थ चेकअप कॅम्पमध्ये आयुर्वेद डॉक्टर आले होते. त्यांनी सांगितलं की माझी पित्तज प्रकृती आहे, म्हणून मला वारंवार अॅसिडिटी, चिडचिड आणि डोकेदुखी होते. मला कुतूहल वाटलं की ही प्रकृती म्हणजे नेमकं काय?”
मी हसून म्हणाले —
“ठीक आहे, मग ऐक… प्रकृती म्हणजे आपल्या शरीर-मनाचा जन्मजात स्वभाव, जो गर्भधारणेच्या वेळीच ठरतो. जेव्हा शुक्र (पुरुष बीज) आणि आर्तव (स्त्री बीज) यांचा संयोग होतो, त्या वेळी दोषांची स्थिती, आई-वडिलांचा आहार-विहार, मानसिक अवस्था, ऋतू, आणि वातावरण — यांचा एकत्रित परिणाम होऊन गर्भाची प्रकृती ठरते.”
अच्छा..म्हणजे माझी प्रकृती माझ्या जन्माच्या आधीच निश्चित झालेली होती..!
प्रकृतीचे कोणते प्रकार असतात?
दोषानुसार नुसार प्रकृती सात प्रकारची सांगितली आहे,
. एकदोषज प्रकृती (Single Dosha Dominant)
वातज प्रकृती: बारीक शरीरयष्टी, कोरडी त्वचा, थंडीची भीती, चंचल मन.
पित्तज प्रकृती: मध्यम शरीरयष्टी, उष्णतेचा त्रास, तीव्र भूक, जलद निर्णयक्षमता.
कफज प्रकृती: स्थूल शरीरयष्टी, शांत आणि स्थिर स्वभाव, थंडी सहन होते.
2. द्विदोषज प्रकृती (Dual Dosha Dominant)
वात-पित्तज
वात-कफज
पित्त-कफज
या प्रकृतीमध्ये दोन दोषांचा एकत्र प्रभाव दिसतो. त्यामुळे त्यांच्या गुणधर्मांनुसार शरीर आणि मनावर प्रभाव पडतो.
3. समदोष प्रकृती (Samadoshaj / Balanced)
या व्यक्तींच्या प्रकृतीत तीनही दोष संतुलित असतात.
ही आदर्श प्रकृती मानली जाते.
त्या डॉक्टरांना माझी प्रकृती कशी कळाली?
प्रकृतीचे परीक्षण आयुर्वेदतज्ज्ञ खालील गोष्टींवरून करतात:
शरीर रचना (शरीराची उंची, वजन, त्वचा, केस)
भूक, झोप, सहनशीलता
स्वभाव, प्रतिक्रिया, बोलणे, हालचाल
रोगप्रवृत्ती
मानसिक व बौद्धिक प्रवृत्ती
ओके..!
प्रकृतीचे महत्त्व काय?
मोनिका उत्सुकतेने विचारलं. मी सांगितलं —
“आपल्याला आपली प्रकृती माहीत असेल तर:
कोणते आजार आपल्याला जास्त होऊ शकतात हे ओळखता येते
कोणता आहार, व्यायाम आणि जीवनशैली आपल्याला योग्य आहे हे समजते
ऋतुनुसार काय बदल करावे हे ठरवता येते
औषधोपचारही अधिक नेमके करता येतात”
प्रकृती बदलते का?
मोनिका म्हणाली —
“म्हणजे जर मला माझी पित्तज प्रकृती त्रास देत असेल, तर मी ती बदलू शकते का?”
मी हसून उत्तर दिलं —
“नाही ग, प्रकृती जन्मतः ठरते, ती बदलता येत नाही. पण तिचं संतुलन राखणं आपल्या हातात आहे. योग्य आहार, दिनचर्या, ऋतुचर्या, आणि आयुर्वेदिक सल्ल्याने त्रास टाळता येतो.”
कॉल संपल्यानंतर मला जाणवलं —
प्रकृतीचं ज्ञान म्हणजे स्वतःची ओळख.
आपल्याला आपली प्रकृती समजली, तर आपण आजार येण्याआधीच त्यांना थांबवू शकतो — हेच तर आयुर्वेदाचं खरे सामर्थ्य आहे.
त्यामुळे आजारी पडण्याआधीच वैद्यांकडून आपल्या प्रकृतीचे परीक्षण करून त्यानुसार आहार आणि विहार सांभाळणे महत्वाचे..!!
डॉ. स्नेहल बोरसे - निकम (तत्वमसि आयुर्वेद,पुणे.) ( 9763083580)



Comments