top of page

बाप्पाच्या रूपात दडलेलं "आरोग्य सूत्र"

Writer: Dr. Snehal Nikam
Dr. Snehal Nikam
Sep 20
3 min read

संध्याकाळची वेळ होती. दिवाणखान्यात बाप्पाच्या मूर्तीसमोर मंद सुगंध दरवळत होता. समोर बसलेला आरव लॅपटॉपवर डोळे लावून, मानेला हात लावत सारखा तक्रार करत होता— "आजोबा, दिवसभर काम करून डोकं पार जड झालंय, पोटात गॅसेस झालेत आणि लक्ष तर कशातच लागत नाहीये!"

आजोबा हसले. त्यांनी आरवला समोर बसवलं आणि बाप्पाच्या मूर्तीकडे बोट दाखवत विचारलं, "आरव, समोर काय दिसतंय रे?"

आरव म्हणाला, "काय आजोबा, बाप्पाची मूर्ती!

"अरे वेड्या, तू फक्त मूर्ती बघतोयस. पण कधी विचार केलायस का, की आपल्या पूर्वजांनी गणपतीच्या रूपात माणसाला आयुष्यभर निरोगी राहण्याचा 'लाईफस्टाईल गाईड' (Lifestyle Guide) दिला आहे?"


आरवचे डोळे चमकले— "कसा काय आजोबा?"


आयुर्वेदिक वैद्य असलेल्या आजोबांनी प्रेमाने सांगायला सुरुवात केली..


1) विशाल मस्तक: ओव्हर थिंकिंग बंद करा, शांत राहा.


"सगळ्यात आधी बाप्पाचं मोठं मस्तक बघ," आजोबा म्हणाले. "मोठं मस्तक म्हणजे ज्ञानाचं आणि विचारांचं प्रतीक. पण आयुर्वेदात डोक्याला (शिर) शरीराचा मुख्य नियंत्रक मानलं आहे. आजकाल तरुणांमध्ये ताणतणाव, मायग्रेन आणि अनिद्रा वाढलीय. बाप्पाचं मस्तक सांगतं— डोकं शांत ठेवा, छोट्या छोट्या गोष्टींचा ताण घेऊ नका. शिरोभ्यङ् ( डोक्याला तेलाची मालिश करणे), आणि नियमित ध्यान (Meditation) करा.


2) बारीक डोळे : एकाग्रतेची किमया


"लॅपटॉपवर टक लावून बसणाऱ्या तुझ्या डोळ्यांकडे बघ आणि बाप्पाचे बारीक, तीक्ष्ण डोळे बघ," आजोबा मिश्कीलपणे हसले.

"बाप्पाचे लहान डोळे म्हणजे सूक्ष्म दृष्टी आणि एकाग्रता. बाह्य जगातील विचलित करणाऱ्या गोष्टी टाळून अंतर्मुख होण्याचा हा संदेश आहे. सतत स्क्रीन बघून डोळे कोरडे पडतात; त्यासाठी आयुर्वेदात त्रिफळा पाण्याने डोळे धुणे किंवा तूप खाण्याचा सल्ला दिला जातो. एकाग्रतेने काम कर, डोळ्यांना विश्रांती दे!"


३. सुपासारखे मोठे कान : ऐका जास्त, ताण कमी करा!


आरव म्हणाला, "आणि ते मोठे कान? त्याला 'शूर्पकर्ण' म्हणतात ना?"

"अगदी बरोबर!" आजोबा म्हणाले. "सुपाचं काम काय असतं? चांगलं धान्य आत ठेवणं आणि फोलपट बाहेर उडवून देणं! आयुर्वेदानुसार कान हे 'वात दोषाचे' मुख्य स्थान आहेत. आजूबाजूला चाललेली नकारात्मक चर्चा, अनावश्यक माहिती ऐकणं बंद करा. चांगलं ऐका, शांत राहा. नियमित कानात तिळाच्या तेलाचे थेंब घातले (कर्णपूरण), तर डोकेदुखी आणि मज्जासंस्थेचा ताण दूर होतो."


४. लांब सोंड : प्राणायाम आणि लवचिकता


"आजोबा, बाप्पाची सोंड काय शिकवते?" आरवने उत्सुकतेने विचारले.


"अरे, सोंड म्हणजे श्वसनसंस्थेचा आरसा! बाप्पाची सोंड बारीक गवताची काडीही उचलू शकते आणि मोठं झाडही हलवू शकते. हीच खरी लवचिकता (Adaptability). दीर्घ आणि खोल श्वास घेणं म्हणजे प्राणायाम! तू दिवसभर बसून उथळ श्वास घेतोस, म्हणून फुफ्फुसांना ताकद मिळत नाही आणि थकवा येतो. सोंडेसारखं मोकळा आणि दीर्घ श्वास घे, त्रिदोष आपोआप शांत होतील."


५. मोठं उदर (लंबोदर) : पचनक्रिया आणि संयम


आरव हसत म्हणाला, "आणि बाप्पाचं मोठं पोट? हे कशाचं प्रतीक आहे?"


आजोबांनी गंभीर होत सांगितलं, "बाप्पाला आपण 'लंबोदर' म्हणतो, कारण ते जगातील सगळ्या चांगल्या-वाईट गोष्टी पोटात सामावून घेतात. पण विज्ञानाच्या दृष्टीने आपलं पोट हे शरीराचं मुख्य इंजिन आहे— 'जठराग्नी'! आयुर्वेदात म्हटलंय: 'सर्वे रोगाः मन्दाग्नौ' (सर्व आजारांचे मूळ पचन बिघडण्यात आहे). तू जे जंक फूड खातोस, वेळेवर जेवत नाहीस, त्याने हा अग्नी मंदावतो. बाप्पाचं उदर सांगतं— भूक ओळखून खा, खाल्लेलं नीट पचवा आणि मानसिक पातळीवर राग-द्वेष पचवायला शिका!"

6. पायाशी बसलेला उंदीर : चंचल मनावर नियंत्रण!


आरव आश्चर्यचकित होऊन म्हणाला, "बापरे आजोबा, मी तर कधी असा विचारच केला नव्हता! आणि तो लहानसा उंदीर (मूषक)?"


आजोबांनी हसत आरवच्या पाठीवर थाप मारली, "तो उंदीर म्हणजे माणसाचं चंचल मन आणि अनिर्बंध इच्छा! उंदीर जसा कुठेही जाऊन कुरतडतो, तसं आपलं मन सोशल मीडिया, गोडधोड खाण्याच्या सवयी आणि आळसामध्ये भटकत असतं. बाप्पाने त्या उंदरावर स्वार होऊन त्याला ताब्यात ठेवलंय. तूही तुझ्या जिभेवर, आळसावर आणि मनावर ताबा ठेवलास, तर आजचे मधुमेह आणि लठ्ठपणासारखे आजार तुझ्या आसपासही फिरकणार नाहीत!"


आरवने लॅपटॉप बाजूला ठेवला, हात जोडले आणि एक दीर्घ श्वास घेतला. त्याला बाप्पाच्या मूर्तीकडे बघताना एक वेगळीच प्रसन्नता जाणवली.


"आजोबा, खरंच! बाप्पाची पूजा करणं म्हणजे केवळ फुले-मोदक वाहणं नाही, तर त्यांच्या प्रत्येक अवयवातून मिळणारा आरोग्याचा संदेश आपल्या रोजच्या जगण्यात उतरवणं आहे!"


तुम्हाला हा विचार कसा वाटला?


या गणेशोत्सवात बाप्पाची आरती करताना, त्यांनी आपल्या शरीराच्या माध्यमातून दिलेल्या या ‘आरोग्य मंत्रांचे’ स्मरण नक्की करा आणि निरोगी, आनंदी जीवनशैली अंगीकारण्याचा संकल्प करा!


🌸 गणपती बाप्पा मोरया! निरोगी भवा! 🌸

 
 
 

Comments


bottom of page