शरद ऋतूचर्या


आज घटस्थापना..!! घरोघरी देवीच्या स्वागताची तयारी सुरू होती. कुणी फुलं आणत होतं, कुणी पूजेची तयारी करत होतं, तर कुणी उपवासाचं नियोजन करत होतं.
सकाळी OPD मध्ये एक पेशंट आली.
पेशंट : डॉक्टर, हल्ली सारखी छातीत जळजळ होतेय. कधी तोंड येतंय, तर कधी चेहऱ्यावर पिंपल्स येत आहेत.
मी : जेवणाच्या वेळा नियमित आहेत का? तिखट-मसालेदार पदार्थ जास्त खाल्ले जातात का?
पेशंट : खरं सांगू का डॉक्टर, सणाच्या गडबडीत स्वतःकडे लक्षच राहत नाही. जेवण वेळेत होत नाहीये. शांत झोप पण होत नाहीये.
मी हसून म्हणाले, “घराची, सणाची सगळी तयारी करतो आपण… पण स्वतःच्या आरोग्याची तयारी करतो का?”
ती हसली आणि म्हणाली, “म्हणजे डॉक्टर?”
मी तिला समजावून सांगितलं…
पावसाळा संपून शरद ऋतू सुरू झाला आहे. पाऊस कमी होतो, आकाश निरभ्र होतं आणि उन्हाची तीव्रता पुन्हा वाढू लागते.
आयुर्वेदानुसार, या काळात पित्तदोषाचा प्रकोप होण्याची शक्यता असते. त्यामुळे काही जणांना आम्लपित्त, त्वचेवर पुरळ किंवा जळजळ यांसारखे त्रास जाणवू शकतात.
मग या ऋतूत नेमकी काय काळजी घ्यायची?
🥣 आहारात थोडे बदल करा!
आपण अनेकदा भूक लागली की काहीही खातो. पण या ऋतूत काय खातो, किती खातो आणि कधी खातो, याकडेही लक्ष द्यायला हवं.
उदाहरणार्थ, रोजच्या जेवणात मूगडाळ, भात, पोळी आणि भोपळा किंवा घोसाळ्यासारख्या भाज्यांचा समावेश करता येईल. डाळिंब, आवळा यांसारखी फळंही खाता येतील.
दूध आणि तूप पचत असेल, तर योग्य प्रमाणात घेता येईल.
याउलट, सतत तिखट-मसालेदार पदार्थ खाणं, जेवणाच्या वेळा चुकवणं आणि भूक लागूनही बराच वेळ उपाशी राहणं टाळावं.
☀️ दिनचर्येत काय बदल कराल?
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतच्या आपल्या सवयींकडे जरा लक्ष द्या.
कडक उन्हात जास्त वेळ राहू नका.
तहान लागल्यावर पाणी प्या.
जेवणाच्या वेळा शक्यतो नियमित ठेवा.
रात्री उशिरापर्यंत जागरण करण्यापेक्षा पुरेशी झोप घ्या.
शरीराला झेपेल असा नियमित व्यायाम करा.
छोट्या वाटणाऱ्या या सवयी आरोग्य जपण्यासाठी उपयोगी ठरतात.
🌿 पंचकर्म करावे का?
आयुर्वेदात शरद ऋतूत विरेचन चिकित्सेला महत्त्व आहे. प्रत्येकानेच विरेचन किंवा रक्तमोक्षण करून घ्यावे. आपली प्रकृती, वय, ताकद आणि आजार यांचा विचार करून वैद्यांच्या सल्ल्यानेच चिकित्सा ठरवावी.
पेशंट : डॉक्टर, एवढे छोटे बदलही महत्त्वाचे आहेत का?
मी : अगं, आरोग्याची काळजी घेण्यासाठी नेहमी मोठे बदल करावे लागतात असं नाही. रोजच्या छोट्या सवयीही महत्त्वाच्या असतात!
घटस्थापनेच्या दिवशी आपण देवीसमोर दिवा लावतो, नवी सुरुवात करतो.
मग यंदा एक संकल्प स्वतःसाठीही करूया ना?
आपल्या शरीराची काळजी घेण्याचा…
वेळेवर जेवण्याचा…
आणि आरोग्याला प्राधान्य देण्याचा!
🌸 कारण सणाचा आनंद तेव्हाच खरा, जेव्हा आपण निरोगी असतो!
शरद ऋतू आलाय… तुमच्या दिनचर्येत कोणता बदल करणार आहात?
✍️ डॉ. स्नेहल निकम (M.D. Ayurveda)
तत्त्वमसि हेल्थ क्लिनिक आणि पंचकर्म सेंटर, पुणे



Comments